ऊर्जेच्या स्त्रोतांवर, खनिजे, नैसर्गिक साधनसंपत्तीवर ज्यांचे नियंत्रण राहील ते जगावरही नियंत्रण ठेवू शकतात. तेच लोक पृथ्वीवरील फुकटात उपलब्ध असलेल्या मटेरियल गोष्टींना बळकावून आपल्या इवल्याशा क्षणभंगुर जिवनात शक्तिशाली बनू इच्छितात, भलेही कितीही जिवितहानी होवो.
काहींना जमेल त्या मार्गाने, वेळ पडल्यास मानवाला जबरदस्तीही करून एकच अल-इल्लाह चे शासन प्रस्थापित करायचे आहे. ईश्वराकडे पोहोचण्याचा एकच मार्ग अन्य कोणताही नसतो म्हणून शून्य उपद्रव करणाऱ्यांनाही तुमचा मार्ग चुकला असे बजावून आपल्यासारखे करून घेणे आणि ह्या कार्याला दैवी मानून मानवाचे स्वतंत्र बुद्धीच्या वापराचे स्वातंत्र्य हिरावून घ्यायचे आहे. कशासाठी? तर - सर्वांना स्वर्गात जाता यावे हा विचार अमलात आणण्यासाठी! यातही जिवितहानीची पर्वा केल्या जात नाही.
सध्या सुरू असलेल्या इस्रायल - अमेरिका - इराण युद्धाचे दोन महत्त्वाचे पैलू म्हणजे साम्राज्यशाही आणि अब्राहमिक धर्मवाद आहे.
सुमारे अडिच हजार वर्षांपूर्वी एक घटना घडली होती. त्या घटनेचे नाव "महाभिनिष्क्रमण" म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. महाभिनिष्क्रमण ह्या शब्दाचा अर्थ महान प्रस्थान (The Great Going Forth) असा होतो.
परंपरा अशी सांगते की - सिध्दार्थ जो शुद्धोधन राजाचा पुत्र होता त्याला रस्त्याने जाताना एक वृद्ध, एक रोगी, एक मृत व्यक्ती दिसला. सिद्धार्थाच्या मनात विरक्ती निर्माण झाली. दुःखमुक्तीचा मार्ग शोधायचा असा त्याने निर्धार केला आणि गृहत्याग केला. कंठक नावाच्या घोड्यावर सिध्दार्थ बसला आणि राजवाडा सोडून कायमचा निघून गेला.
आता तथ्य-तर्क काय सांगते ते पाहूया -
सिध्दार्थाने वयाच्या २९ व्या वर्षी गृहत्याग केला. तोपर्यंत त्याला एकही वृद्ध, रोगी आणि मयत व्यक्ती दिसला नसावा असे होऊ शकत नाही. तर मग असे काय घडले असावे की त्याने एवढे ऐश्वर्य सोडून गृहत्याग केला?
जे घडले ते पुढीलप्रमाणे - सिध्दार्थाच्या काळात भारतीय उपखंडात महाजनपदे, जनपदे, गणराज्ये असत. सिद्धार्थ हा शाक्य गणराज्याचा राजा क्षत्रिय शुद्धोधनाचा पुत्र. शाक्यांचे शेजारी गणराज्य होते कोलीय. दोन्ही राज्यांच्या मधून वाहत होती रोहिणी नदी. ह्या रोहिणी नदीच्या पाण्याच्या वापरावरून दोन्ही राज्यांत नेहमी भांडणे होत राहत.
सिध्दार्थ २९ वर्षाचा झाला. शाक्य गणराज्यातील प्रौढांचा एक संघ असे. त्याला शाक्य संघ म्हणत. एका विशिष्ट वयानंतर संघाचा सदस्य बनणे सर्वांना अनिवार्य असे.
रोहिणी नदीचा वाद शाक्य संघाच्या मंचावर निकाली काढण्याचा निर्णय झाला. संघातील सर्वांनी कोलियांविरूद्ध सशस्त्र युद्ध करून रोहीणी नदीचे पाणी 'आपले' करून घेण्याचा एकमताने निर्णय घेतला.
मात्र एक मोठी अडचण आली..
एकमताने घेतलेल्या निर्णयाला सिध्दार्थाने नकार दिला! त्याने शाक्य आणि कोलिय ह्यांनी आपापसात शांततापूर्ण बैठक घेऊन नदीचे न्याय्य पाणीवाटप करावे ही सुचना केली. युद्धामुळे दोन्हीही बाजूंचे नुकसान होईल, जिवितहानी होऊन हाती काहीही लागणार नाही, यापुढील पिढ्याही एकमेकांवर सुड उगवत राहतील. याउलट, शांततापूर्ण करार करून दोन्ही राज्ये सुखात राहू शकतील असे त्याचे म्हणणे होते.
परंतू.. सिद्धार्थाच्या मताची पुष्टी करणारा संघात एकही नव्हता. क्षत्रिय राजपुत्रानेच युद्ध टाळणे म्हणजे अपमानास्पद बाब आहे अशी सर्व प्रौढांची धारणा होती.
संघाचा एक नियमही होता - जो कुणी सार्वत्रिक मताविरुद्ध जाईल त्याला दंड म्हणून संघातून हकालपट्टी करणे! गणराज्य सोडून जाणे! स्वयं राजा का असोना, कुणालाही अपवाद म्हणून सुट नव्हती. नियम आणि दंडाच्या बाबतीत पुर्णतः समानता!!
सिद्धार्थाला त्याचा नकार मागे घेण्याची त्याच्या वडिलांनी विनंती केली. सिद्धार्थ मात्र आपल्या मतावर ठाम - युद्ध नकोच. चर्चेने प्रश्न सोडवू.
शाक्य संघाच्या नियमानुसार सिध्दार्थाला घर आणि राज्य सोडून जाणे भाग पडले. राज्यात शोकांतिका पसरली. सिद्धार्थ डळमळला नाही. तृष्णा उत्पन्न कोठून होते? त्यातून दुःखाची निर्मिती कशी होते? याचा कार्यकारणभाव ओळखून सुखाचाही मार्ग शोधायचा त्याने निर्धार केला. कंठक नावाच्या प्रिय घोड्यावर स्वार होऊन सिद्धार्थ गौतमाने महाभिनिष्क्रमण केले.
तेथून पुढे सहा वर्षे तो रानावनात भटकला, चिंतन, मनन करत राहिला. सारं ऐश्वर्य मागे सोडून, अतिशय कठोर मार्ग पत्करला. तब्बल सहा वर्षांनी, वयाच्या पस्तीसाव्या वर्षी त्याला ज्ञानप्राप्ती झाली. ते ठिकाण म्हणजे बिहार राज्यातील बुद्धगया. सिद्धार्थाचा आता तथागत बुद्ध झाला. पहिल्या पाच मित्रांना त्याचा धम्म प्रथम सांगण्यासाठी बुद्ध बिहार येथून मध्यप्रदेशातील सारनाथ येथपर्यंत पायी चालत गेला. पायाला कधी मातीही न लागलेला आधिचा सिद्धार्थ बुध्द झाल्यावर पुढील सुमारे ४५ वर्षे पायी चालून चालून भारतभर दुःखमुक्तीचा मार्ग सांगत जनमानसात फिरत राहिला!!
खुद्दक निकायात "धम्मपद" नावाचा एक छोटा ग्रंथ आहे. त्यात एकूण ४२३ बुद्धवचने आहेत. त्यातील दोन वचने -
नत्थि रागसमो अग्गि, नत्थि दोससमो गहो।
नत्थि मोहसमं जालं, नत्थि तण्हासमा नदी॥
अर्थ - आसक्ती सारखी आग नाही, द्वेषासारखा ग्रह नाही. अज्ञानासारखे जाळे नाही, तृष्णेसारखा प्रवाह(नदी) नाही.
न हि वेरेन वेरानि, सम्मन्तीध कुदाचनं।
अवेरेन च सम्मन्ति, एस धम्मो सनन्तनो॥
अर्थ - वैराने वैर शमत नाही, ते अवैरानेच शमते हाच सनातन धर्म (पुर्वापार सिद्धांत) आहे.
सद्य सुरू असलेला नरसंहार थांबावा इतकं समजण्यासाठी आताच्या सो कॉल्ड प्रगत मानवाला बुद्धाने सांगितलेल्या ज्ञानाच्या अथांग महासागरातील दोन बुद्धवचने पुरेशी नाहीत का?
- अविनाश निरंजन वावरे.
Comments
Post a Comment