Skip to main content

श्रमप्रतिष्ठा (संविधान दिनाच्या निमित्ताने)

एक काळ असाही होता की लोकं मालकाकडे सालाने काम करायचे. जमिनदार, व्यापारी, उद्योजक ह्यांच्याकडे काम करणाऱ्या अशा लोकांना सालगडी म्हणत.

सालगड्याला वर्षभर काम करून मोबदला म्हणून तुटपुंजे धान्य मिळतसे. पैसे मिळत नव्हते. जेवढे धान्य मिळी त्यातून कुटूंबाचे पोट नाही भरले तर घरातील अल्पवयीन मुलांसह इतरही मंडळी रोजंदारीचे काम शोधायचे.

 पिढ्यानपिढ्या राबून हाती काहीही उरत नसे. कुटुंबाची प्रगती दुरची गोष्ट. हे दुष्टचक्र असच एका पिढीकडून दुसर्‍या पिढीपर्यंत अव्याहत चालू राहायचे. ह्यातून सुटकाही नव्हती.

आता सालगडी दिसतात का? तर - नाही. मजुर कामासाठी मिळणाऱ्या वेतनात सौदा करू शकतो. त्याला परवडले तर तो काम स्विकारतो अन्यथा नाकारतो. कित्येक जण कामाला मजूरच मिळत नाही अशी चर्चा आजूबाजूला करताना दिसतातच. सोशल सेक्युरीटी, डिबीटी इ. मुळे मजूर भाव खातात अशी खंतही अधुनमधुन व्यक्त होताना दिसते. केवळ ५०० मीटर पायी चालला तरी दमछाक होणारा म्हणतो की ८-८ तास शारिरीक परिश्रम करणारे "मजूर आळशी झालेत!" 

तर मित्रा, तू ठरवलेल्या भावात मजूर मिळत नाही म्हणून जी खंत व्यक्त करतो त्याच भावात तू स्वतः ८ तास इतर कुणाकडे राबायला तयार आहेस का? झेंडुराव म्हणेल मी तर बौद्धिक कष्ट करतो. त्यामुळे त्या कष्टाचे मुल्यांकन जास्त होते. जर असे आहे तर मजुराने केलेल्या कष्टाची श्रमप्रतिष्ठा नसते, फक्त तुझ्याच कष्टाची असणारे असे म्हणायचे का तूला? तूला जो मजूरी-दर महागडा वाटतोय त्याच्या दिडपट दाम जरी दिला तरी तू ते काम करायला तयार होशील का? तर नाही! तुला तुझ्या कष्टाचा दाम ठरवायचा जसा अधिकार आहेना तसाच त्या मजुराला सुद्धा आहेय!!

वेठबिगारांच्या पिढ्या नासवून जमीनदारांना अधिक गब्बर बनविणारी यंत्रणा आज खिळखिळी झालेली दिसते. हे आहेय संविधानातलं - "एक माणूस, एक मूल्य." 
श्रमप्रतिष्ठा.. 

कुणालातरी "फक्त जगण्यापुरते मिळेल" या मोड वर ठेवता येत नसल्याची खंत जाऊन तुझ्यातला माणूस जागा होईल ना तेव्हा - संविधानातील ४५० पेक्षा जास्त आर्टिकल्स पैकी - आर्टिकल-३९ थोडफार समजलं असा गृहीत धरू शकतोस.

- अविनाश निरंजन वावरे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आधुनिक शासन संस्था आणि सेक्युलरीजमचा अन्वयार्थ

"गॅलिलिओ विरुद्ध चर्च" सुनावणीचा खालील फोटो बघा: सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत बायबलला अनुसरून इटालियन कॅथॉलिक चर्चची अशी धारणा होती की "सुर्य हा पृथ्वीभोवती फिरतो." गॅलिलिओने त्याची दुर्बीण वापरून निरीक्षण नोंदवले - सुर्य पृथ्वीभोवती फिरत नसुन पृथ्वीच सुर्याभोवती फिरते.  गॅलिलिओ तसा धर्माभिमानी कॅथॉलिक ख्रिश्चन. परंतु, त्याचे निरीक्षण चर्चच्या मताच्या पुर्णपणे विरूद्ध म्हणून चर्चने त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. कालांतराने तो आंधळा झाला. मरण पावला.  तेथून कित्येक वर्षांच्या वैज्ञानिक प्रगतीनंतर चर्चने आपले मत बदलले. गॅलिलिओ बरोबर होता हे मान्य केले. आता गॅलिलिओ चा अतृप्त आत्मा हातात लालसडक भाला घेऊन चर्चच्या धर्मगुरूंना शोधतही असेल तर त्याचा काय फायदा? पाखंडी घोषित करून जीव घेतला ना त्याचा!  जवळजवळ सर्वच संस्थात्मक धर्मांचा पारंपरिक उद्देश म्हणजे पारलौकिक कल्याण असतो. त्यासाठी त्या-त्या धर्माकडे एक ग्रंथ असतो. त्या ग्रंथाला सर्व धर्मानुयायी प्रमाण मानत असतात. ग्रंथातील देववाणीचा अर्थ लावणे, इतरांना समजावून सांगणे हे धर्मगुरूचे काम असते. थो...

भारतीयांचा स्किन टोन आणि झेंडुरावची कंडिशनिंग

नुकताच महिला आयसीसी विश्वचषक भारताने जिंकला आणि खालील फोटो समाजमाध्यमांत सगळीकडे व्हायरल झाला: समस्त भारतीय स्त्री-पुरूषांचा स्किन टोन ढोबळमानाने असाच काहीसा असतो!!  मात्र, आपली लहानपणापासून अशी जडणघडण झालेली आहे की आपल्याला (विशेषतः पुरूषांना) गोऱ्या कातडीचे विशेष आकर्षण आहे. समोर तुपकट चेहरा दिसला की झेंडुराव लगेच इंप्रेस्ड होऊन जातो. गोऱ्या कातडीला स्त्रिया सुद्धा मापदंड मानून तसं दिसण्याचा प्रयत्न करतात. आपलं अपत्य सुद्धा गोरं असावं असे सगळ्यांना मनोमन वाटतच राहते. कसलीही सृजनशीलता नसलेल्या, कौशल्य, नवनिर्मितीची इच्छा नसलेल्या, गुणवत्ताहीन, ढिम्म अशा पोरींना आपल्यातले झेंडुराव फक्त तिची कातडी गोरी आहे म्हणून अख्खं  आयुष्य फुकट प्रिवीलेज देतात. "तोंड पहा आणि फुले वाहा" म्हणत जी गोष्ट आईवडिलांकडून फुकटात मिळाली त्याला Asset समजून अगदी शुन्य कर्तुत्व असलेली पोरगीही स्वतःला ग्रेट समजू लागते. तिच्यासारख्या समकक्ष दिसायला असण्याऱ्याच मुलींशीच मैत्री करते. तर, झेंडुराव तुझी कंडिशनिंग चुकीची झालीये. हे तुपकट सौंदर्य म्हणजे मुळ भारतीय सौंदर्य नव्हे. गोरा रंग म्हणजे काह...

शाश्वत पुनरावृत्ती

मीच इतका का अस्ताव्यस्त? हा प्रश्न मनात पुन्हा-पुन्हा गुंततो. काहीतरी चुकतंय का माझ्यात, हा विचार डोक्यात वादळासारखा घोळतो. पण मित्रा — तू एकटा नाहीस या मार्गावर. अर्थ शोधणारे असंख्य जीव तुझ्या सोबतीला चालत आहेत निरंतर. अडचणी वेगळ्या, पण चक्र एकच, शाश्वत पुनरावृत्ती सुरूच अखंडित. हेच कटू वास्तव मान्य कर,   शिकव मनाला स्वीकाराचे सूरसंगीत!  जेव्हा उमजेल जाणीव-नेणीवेतून — सुटका नाही या प्रवासातून, तेव्हाच उघडतील अंतःकरणाचे दरवाजे, आणि त्यातून झुळूक येईल — मोक्षाची!!  - अविनाश निरंजन वावरे